शेतकरी – कामगार – सहकार – शिक्षण – आरोग्य या पंचसूत्रीवर स्वराज्य संघटना काम करेल. हे सर्व घटक एकमेकांशी संबंधितच आहेत. यांना कुणी वेगळ करू शकत नाही. या घटकांना सक्षम व परिपूर्ण बनविणे, म्हणजेच विकास होय. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी, त्यांना सक्षम व संपन्न बनविण्यासाठी लढा देणे हेच ‘युथ फॉर किनवट माहुर’ चे उद्दिष्ट आहे.
शेतकरी : महाराष्ट्रातील शेतकरी वर्गापुढे आज अनेक अडचणी उभ्या आहेत. खतांचे व बियाणांचे भाव, पीक विमा, कृषी कर्ज अशा अनेक बाबतींत शेतकरी पिचला जात आहे. नैसर्गिक आपत्तीचे संकट तर नेहमीच असते, मात्र त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात देखील शासन – प्रशासन नैराश्य दाखवते. शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध व्हावे, याकरिता शासन – प्रशासनाला योग्य पद्धतीने भरीव योजना राबविण्यास व शेतकरी वर्गास न्याय देण्यास युथ फॉर किनवट माहुरची संघटीत शक्ती भाग पाडेल.
शिक्षण : राष्ट्राच्या उन्नतीसाठी शिक्षण हा अविभाज्य घटक आहे. शिक्षण हा समृद्धीचा पाया आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर कला, क्रीडा, संस्कृती, कृषी, कौशल्य, आरोग्य, उद्योग-व्यवसाय या सर्व बाबींचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. कोणत्याही क्षेत्रात कार्य करायचे असेल तर त्या क्षेत्रातील शिक्षण असणे अत्यंत गरजेचे असते. जितके चांगले शिक्षण, तितकी जास्त प्रगती व तितकेच समृद्ध जीवन हा सरळ साधा मंत्र आहे.
यासाठी शिक्षण व्यवस्था तितकी सक्षम असणे गरजेचे आहे. सध्याच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. शिक्षणाचा दर्जा खालावलेला आहे. हि परिस्थिती सुधारण्यासाठी व गोरगरीब व सर्वसामान्य मुलांना, त्यांच्या कौशल्यांना वाव देणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी युथ फॉर किनवट माहुर कार्यरत राहील.